परि अमृतातेही पैजा जिंके
विश्व स्वधर्म सूर्ये पाहो॥
बोलतो मराठी
अवघे विश्व तरावे
जिंकून विश्व सारे, बोलेन मायबोली
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे
२००० पासुन आमच्य़ा तीन वेबसाईट्स अस्तित्वात होत्या. त्यावेळी प्रचलित असलेल्या सॉफ्टवेअर वापरून त्या केलेल्या होत्या. त्यात बदल करणं आम्हाला तेव्हढ सोपं नव्हतं. त्यामुळे त्या शिळ्य़ा झालेल्या होत्या. आमचं काम तोपर्यंत खूप पुढं गेलं होतं. या वेबसाईट्स कात टाकून नव्यानं ताज्या कराव्यात असं वाटत होतं. दुसर्याला काम देण्याचेही बरेच प्रयत्न करुन झाले होते.
श्री. प्रसाद शिरगांवकर संस्थेचे माजी विद्यार्थी. अतिशय बुध्दिमान, हसरं व्यक्तिमत्व, हळुवार शायराचं मन, तरीही यशस्वी शैक्षणिक व व्यावसायिक नावलौकिक असलेले. देशात व परदेशांत उत्तम कामाचा अनुभव असलेले. एप्रिल २००८ मध्ये आमची बर्याच वर्षांनी गांठ पडली. महर्षि विनोदांची वेबसाईट पुनरुज्जिवित करू या असं मी म्हणल्यावर ते म्हणाले, "अहो मी अशा प्रकारचं म्हणजे मराठी वेबसाईट्स करण्याचं काम करतो. “.
मग आम्ही मीटिंगची वेळ ठरवली. ते मुद्दे काढून जय्यत तयारीनं आले होते. त्यांनी काही मोजक्या पण महत्वाच्या मुद्यांवर मला विचार करायला सांगितला. आवाजात पूर्वीसारखाच गोडवा, विचार करत अंदाज घेतघेत शब्द देण्याची सवय.
वेबसाईट तयार करण्याच्या तांत्रिक जगापासून तोपर्यंत मी लांब गेले होते. पाटी कोरी करुन मी नव्यानं काम करायला सुरुवात केली. वेबसाईटमधून मला काय वाचकांपर्यंत पोचवायचय? माझे हेतू काय आहेत? इथपासून ते ले आऊट, टेंप्लेटचे सिलेक्शन, त्यांच्या सॉफ्टवेअरची संरचना, विविध फायदे इ. मी त्यांच्याकडून समजून घेत गेले.
सुरुवातीला केलेला विचार-हेतू मर्यादित होते. नवीन बरंच शिकावं लागणार हे दिसत होतं, मला जुलैच्या गुरुपौर्णिमेची वेळ प्रकाशनाकरीता गाठायची होती. हातात अडीच महिने होते आणि हजारो पानं, प्रतिमा साईटवर घालायच्या होत्या. अक्षरशः सतीची वाण घेतलं होतं. प्रसादच्या भक्कम पाठिंब्यामुळे मी निश्चिंत होते.
बरहा हे मोफत सॉफ्टवेअर डाऊनलोड करणं, युनिकोडमध्ये टाईप करायला शिकणं, आधीच्या मराठी फाईल्सचं रुपांतर याच नावाच्या सॉफ्टवेअरच्या मदतीनं युनिकोडमध्ये करणं, निवडलेल्या प्रतिमा गुगल-पिकासा वेब-अल्बम मध्ये टाकून त्याचे एचटीएमएल लिंक्स वेबसाईटमध्ये देणं, बुकपेज तयार करणं, त्याचं नेविगेशन करणं, इव्हेंट तयार करायला शिकणं इ. अनेक गोष्टी मी त्यांच्याकडून शिकले. ग्राहकाची गरज, मेहनत घेण्याची तयारी, शिकण्याची तयारी लक्षात घेऊन त्याप्रमाणे लवचिकता प्रसाद ठेवतात व ग्राहकाला संपूर्ण समाधान मिळेल असं ते पहातात.
व्यासपौर्णिमेला आमच्या वेबसाईटचं प्रकाशन झालं, प्रसादनं स्वतः जातीनं येऊन कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यावेळी त्यांची भूमिका नम्र होती. आमच्या एका साईटचे काम ९५% झालं आहे, दुसर्या साईटचे काम ८०% झालंय, तिसर्याचं काम २०% झालंय. हे सर्व गेल्या ५ महिन्यातलं काम.
मी कितीही बदल सुचवले तरी ते वास्तवाचं भान ठेवून व सर्वंकष विचार करुन सल्ला देतात, हे मला प्रसादचं परिपक्वतेचं लक्षण वाटलं. आमची एकदाही या काळात वादावादी झाली नाही, पैशावरुन गैरसमज झाले नाहीत. नात्यातली मैत्री व आपुलकी अधिक मॅचुअर झाली.
त्यांच्या कार्याला आमच्या हार्दिक शुभेच्छा!